Burglary Gang Arrested : पोखरीतील ‘त्या’ घरफोडीचा अखेर छडा! अहिल्यानगरच्या टोळीने घातला होता धुमाकूळ; तिघे गजाआड
Burglary Gang Arrested : पोखरी (ता. आंबेगाव) येथील घरफोडी प्रकरणातील तीन आरोपींना घोडेगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गुन्ह्यात वापरलेले कोयतेही जप्त.

Burglary Gang Arrested – आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा घोडेगाव पोलिसांनी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून, स्थानिक पातळीवर या कारवाईचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोखरी येथे सविता बुधाजी करवंदे यांच्या घरात १३ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कुटुंबीयांना धाक दाखवत सोन्याचे दागिने लंपास केले होते.
या घटनेनंतर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण करून स्थानिकांकडून माहिती गोळा करून सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान अकोले (ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील अकोले पोलीस ठाणे गु.र.नं. १६५/ २०२६ भा.न्या.सं.कलम ३१०(२) अन्य गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीची कबुली दिली.
त्यानुसार बाबूशा काळे (वय २२), शुभम काळे (वय २०) आणि रवी भोसले (वय ५०, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) येथील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी ताब्यात घेवून आरोपी घोडेगाव पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले होते. आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने त्यांचा साथीदार कबीर काळे यांच्याकडे दिले असल्याचे सांगून, गुन्ह्यात वापरलेले कोयतेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास सुरू असून, इतर गुन्ह्यांशी आरोपींचा संबंध आहे का? याचीही चौकशी केली जात आहे.
“या गुन्ह्याचा तपास तांत्रिक पद्धतीने व वेगाने करत आरोपींना अटक करण्यात यश आले. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”
– सागर पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव पोलीस ठाणे.





