Bhimashankar News | चाळण झालेल्या भीमाशंकर रस्त्याची अखेर डागडुजी सुरू

प्रभात वृत्तसेवा
मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर या रस्त्यावरील तळेघर ते कोंढवळ फाटा या पंधरा किलोमीटर रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.यामुळे वाहनचालक,भाविकभक्त,स्थानिक ग्रामस्थ,प्रवासी वैतागले आहे.याबाबत अनेकदा आंदोलने करण्यात आली असून प्रशासनाने याची दखल घेऊन या रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर व आजूबाजूच्या परिसरात मे महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. हे खड्डे चुकवताना लहान मोठे अपघात झाले आहेत. प्रवाशांना व भाविकांना धक्के खात भीमाशंकराचे दर्शन घ्यावे लागत होते. याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने दखल घेतली असून रस्त्यावरील खड्डे जे.सी.बी. आणि रोडरोलरच्या सहाय्याने बुजवण्यास सुरुवात केली आहे.
याठिकाणी खड्डे बुजवण्यास फक्त खडीचाच वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. खडीबरोबर थोड्या प्रमाणात सिमेंटचा वापर केल्यास रस्ता थोड्याफार प्रमाणात चांगला होऊन वाहनाच्या टायरने खड्ड्यात टाकलेली खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरणार नाही. याठिकाणी सुरू असलेले काम अतिशय संथ गतीने होत असून गेले पाच ते सहा दिवसांपासून तळेघरपासून फक्त दीड किलोमीटरपर्यंतचे खड्डे बुजवण्यात आले आहे.
हे काम करताना तळेघर, गाडेवाडी, राजपूर, पालखेवाडी, म्हतारबाचीवाडी येथे रस्त्याच्या कडेची गटारे बुजल्याने कायम रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने प्रथम रस्त्याच्या कडेची गटारे साफ करावी,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे. रस्ता दुरुस्ती करण्याची जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आहे.या विभागाने याठिकाणी सुरु असलेल्या कामाची वेळोवेळी पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार होण्यासाठी लक्ष घालावे.अशी अपेक्षा वाहनचालक,स्थानिक ग्रामस्थ,प्रवासी यांनी केली आहे.





