Road Safety : खड्डे बुजवण्यासाठी पोलिसच रस्त्यावर ; राजगड वाहतूक विभागाच्या पुढाकाराने वाहतूक कोंडीतून दिलासा

प्रभात वृत्तसेवा
नसरापूर – पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाढत्या अपघातांमागे प्रमुख कारण ठरत असलेल्या खड्ड्यांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पोलीस दलच रस्त्यावर उतरल्याचे चित्र शनिवारी, (दि. २७) पाहायला मिळाले. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर निगडे गाव हद्दीतील राजगड सहकारी साखर कारखाना पूल परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राजगड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने थेट पुढाकार घेतला.
कापूरहोळपासून राजगड कारखाना पुलापर्यंत महामार्गावर असंख्य खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत होते. अपघातांचे प्रमाण वाढले होते. यामुळे वाहतूक पोलीस स्वतः जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर उतरले आणि खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.“दररोज या खड्ड्यांमुळे आमच्या गाड्यांचे नुकसान होत होते. अपघाताचा धोका कायम डोळ्यासमोर असायचा. पोलिसांनी असे पुढे येऊन खड्डे बुजवले, हे खरंच आश्वासक आहे,” असे वाहनचालक गणेश पाटील यांनी सांगितले.
राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी भुरटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस पथकाने कापूरहोळ ते निगडे गावदरम्यानचे खड्डे बुजवले. या कामानंतर वाहतूक सुरळीत झाली असून वाहनचालकांना सुरक्षित आणि वेगवान मार्गक्रमण शक्य झाले.हॉटेल व्यवसायिक रुपेश देवघरे म्हणाले, “महामार्गावरील खड्ड्यांमुळे ग्राहक कमी येत होते. अपघातांची भीती सतावत होती. पोलिसांनी असा पुढाकार घेतला याचे स्वागत करावेच लागेल.
मात्र, प्रशासनानेही वेळेत काम करून घेतले पाहिजे.सामान्यतः खड्डे बुजवण्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरणाकडे असते. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पोलिसांनी स्वतः पुढाकार घेतल्याने लोकसेवा हीच खरी धर्मसेवा असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण नागरिकांच्या डोळ्यांसमोर आले.





