Bhimashankar News | भीमाशंकर मंदिर सुलभ होणार ; २८० कोटींचा विकास आराखड्याचा प्रस्ताव

प्रभात वृत्तसेवा
मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यासाठी २८० कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही. श्रीक्षेत्र भीमाशंकरचे दर्शन सुलभ होईल यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते रमेश येवले, जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, राष्ट्रीय युवा सरचिटणीस सचिन बांगर, जिल्हा संघटक नित्यानंद येवले, तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील, उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, दत्ता गांजाळे, जिल्हा समन्वयक कल्याण हिंगे पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, श्रावण महिन्यात दरवर्षी भीमाशंकरला लाखो शिवभक्त येत असतात. त्यातलाच मी पण एक शिवभक्त असून मीही अनेक वर्षापासून श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनाला येत असतो. या ठिकाणी आल्यानंतर अनेक भाविक, शिवभक्त भेटतात, त्यामुळे मनाला समाधान मिळते. भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी येताना अनेक अडचणी निर्माण होतात.
हे अडचणी सोडवण्याचे काम करू.श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात दर्शनाला येण्याची परंपरा धर्मवीर आनंद दिघे यांनी घातली असून ही परंपरा आपण पुढे चालू ठेवली आहे. भीमाशंकर मंदिर प्राचीन मंदीर आहे. या ठिकाणी दर्शनाला आल्यामुळे मनाला समाधान मिळते. राज्यात वरूणराजा चांगल्या प्रकारे बरसत आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर चरणी बळीराजा, शेतकऱ्याला सुखी होऊ दे, चांगले पीक येऊ दे, शेतकऱ्याच्या जीवनात सुख समाधान आनंद येऊ दे, असे मागणे मागितले आहे.





