Pune District : भिमाजी खेडकर प्रवेशद्वार अभिवादन सोहळा; रांजणगावात गणपती येथे जुन्या आठवणींना उजाळा
Pune District : गावच्या सामाजिक, राजकीय व ग्रामविकासाच्या वाटचालीत भिमाजी खेडकर यांनी दिलेले योगदान यावेळी उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केले.

रांजणगाव गणपती :रांजणगाव गणपती येथील माजी आदर्श सरपंच, समाजभूषण, प्रसिद्ध गाडामालक व बागायतदार कैलासवासी (स्व) भिमाजी (आप्पा) सदाशिव खेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘स्व. भिमाजी (आप्पा) सदाशिव खेडकर प्रवेशद्वार’ अभिवादन सोहळ्याचे आयोजन शनिवार (दि.५) रोजी सायंकाळी महात्मा फुले चौक, रांजणगाव गणपती येथे करण्यात आले.
गावच्या सामाजिक, राजकीय व ग्रामविकासाच्या वाटचालीत भिमाजी खेडकर यांनी दिलेले योगदान यावेळी उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केले. आदर्श सरपंच म्हणून केलेली ग्रामसेवा, बागायतदार म्हणून शेतीशी असलेले नाते तसेच बैलगाडा संस्कृतीवरील प्रेम आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा, यामुळे आप्पांनी ग्रामस्थांच्या मनात निर्माण केलेले स्थान आजही कायम असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे संचालक आबासाहेब पाचुंदकर, खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी मामा शेळके, शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भारतीय कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाचुंदकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख संदीप शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, पंचायत समितीचे माजी सदस्य विक्रम पाचुंदकर, उपसरपंच नम्रता शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे, अनिल दूंडे, शिवाजी खेडकर, नितीन लांडे, महेश फंड, नारायण पाचुंदकर, भानुदास शेळके, देविदास शेळके, अजय गलांडे, उत्तम कुटे, रावसाहेब पाचुंदकर, तुकाराम पवार, जितेंद्र फंड, डॉ. अजित लांडे, डॉ. राजेंद्र गदादे, अॅड. अतुल खेडकर, पंडित खेडकर, सर्जेराव खेडकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेले हे प्रवेशद्वार त्यांच्या कार्याची आणि रांजणगावशी असलेल्या अतूट नात्याची कायमस्वरूपी आठवण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गावासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तीची स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत ठेवण्याचे काम या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून होत आहे, असेही मान्यवरांनी नमूद केले. प्रा. माणिकराव खेडकर यांनी प्रास्ताविक केले, संपतराव खेडकर यांनी आभार मानले.





