Bhatghar Dam: ऐतिहासिक भाटघर धरण १०० टक्के भरले; नीरा नदीत २,६१५ क्युसेकने विसर्ग सुरू
Bhatghar Dam: पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांना मोठा दिलासा; धरणातील वाढत्या साठ्यामुळे पूर्वेकडील शेतकरी समाधानी.

Bhatghar Dam – पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) रविवारी (दि. २) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले. धरणातील वाढती आवक पाहता, वीज निर्मिती केंद्रातून १, ६१५ क्युसेक आणि स्वयंचलित दरवाजांमधून १, ००० क्युसेक, असा एकूण २, ६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
दुसरीकडे, नीरा देवघर धरण ३० जुलै रोजीच १०० टक्के भरले असून, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या दोन्ही धरणांतील पाण्याचा विसर्ग नीरा नदीत होत असल्याने नदीला पूर आला असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
सहाय्यक अभियंता (श्रेणी–२) गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचा साठा वेगाने वाढला. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण तब्बल १५ दिवस आधीच पूर्ण क्षमतेने भरले आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
नागरिकांनी नीरा नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात सुरू असलेली विकासकामे थांबवून बांधकाम साहित्य व कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलवण्यात यावेत. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असा इशारा भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिला आहे.
३ जिल्ह्यांतील ९ तालुक्यांना दिलासा!
भाटघर धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता २३.७५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील तब्बल ९ तालुक्यांमधील हजारो हेक्टर शेतीसाठी होतो. धरण १०० टक्के भरल्याने दुष्काळी व पूर्वेकडील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.





