Vikas Gogawale : २ डिसेंबर २०२५ महाड नगरपालिका निवडणुकीदिवशी मतदान सुरू असतानाच एक मोठी घटना घडली होती. शिदेंसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर कोर्टात सुनावणी पार पडली असून, विकास गोगावले यांनी कोर्टात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे विकास गोगावले यांना अटक झाल्यास भरत गोगावलेंसाठी मोठा धक्का असणार आहे. नेमकं प्रकरण काय? महाड नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात शिंदेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर माणगाव कोर्टाने दोन वेळा आणि मुंबई कोर्टाने एकदा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मतदानाच्या दिवशी विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे महाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून विकास गोगावले हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. खरंतर रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध गोगावले असा राजकीय वाद कायमच चर्चेत असतो. पालकमंत्री पदावरून दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने वाद होताना दिसतो. गेल्या काही काळामध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद अधिक मोठा झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वैर वाढले असून मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपआपसात भिडले आणि त्याचा उर्देक पाहायाला मिळाला. हेही वाचा : भरत गोगावलेंच्या मुलाच्या अडचणी वाढल्या! ‘त्या’ प्रकरणातील जामीन अर्जावर कोर्टाचा मोठा निर्णय