भंडारदरा-निळवंडे धरणे भरली, विसर्ग सुरू… प्रवरा नदीला पुर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले – काही दिवसांच्या विश्रांती नंतर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाल्याने दरवर्षी १५ ॲगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरणारे भंडारदरा धरण अखेर आज दि २० ॲगस्ट २०२५ रोजी पहाटे तांत्रिक दृष्ट्या भरले असुन भंडारदरा धरणातून २०७६३ क्युसेकने तर निळवंडे धरणातून ११,९१९ क्युसेकने असा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आला असुन वाढत्या पाण्याचे आवकेनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाल्याने धरणांमध्ये पाण्याच्या साठ्यात जलद वाढ होत आहे. मे महिन्याचे मध्यातच पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु होऊन मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत असताना तांत्रिक दृष्ट्या पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले तसेच कॅनलद्वारेही पाणी सोडण्यात आले मात्र जुलै चे शेवटी पाऊस कमी होऊन ऑगस्टच्या सुरूवातीला पाऊसच थांबल्याने व दरवर्षी १५ ॲगस्टला भंडारदरा धरण भरण्याची परंपरा खंडित झाली होती. त्यानंतर १८ व १९ ॲगस्ट पासून पुन्हा मुसळधार पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु झाला आहे.
काल दिवसभरात जिल्ह्याची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या घाटघरला १६० मी.मी व रतनवाडी १७० मि.मी, एवढा पाऊस झाला जोरदार सुरु असलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात डोंगर द-र्यात उंचावरून धबेधबे कोसळत आहे ओढे, नाले खळखळून वाहत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक भंडारदरा धरणात येत असल्याने धरणाचा जलसाठा जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे आज बुधवार २० ॲगस्ट २०२५ रोजी पहाटे भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरुन भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १०,९०९ द.ल.घ.फु.व निळवंडे धरणाचा ७४४१ द.ल.घ.फु पाणीसाठा झाला आहे.
धरणांध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनाने भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरून भंडारदरा धरणातून सकाळी ११ वा २०७६३ क्युसेकने व निळवंडे धरणातून ११९१९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे प्रवरा नदीला पुर आला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणानुसार धरणामधुन पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभाग, तहसीलदार व प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
काल दिवसभरात व मे पासून आतापर्यतचा एकुण पाऊस
भंडारदरा – १०५ मी.मी एकुण – १९७६ मी.मी.
घाटघर -१६० मी.मी एकुण – ४०२६ मी.मी
पांजरे – १०५ मी.मी -एकुण -२४१८मी.मी
रतनवाडी – १७० मी.मी एकुण- ४१४१ मी.मी
वाकी – १०२ मी.मी. एकुण- १६७६ मी.मी
निळवंडे – ६३ मी.मी एकुण- ८५० मी.मी
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने निसर्ग अजुनच बहरला आहे धबधबे उंचावरून फेसाळत कोसळत आहे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने रंधा धबधब्याने राैद्र रुप धारण केले आहे. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या परिसरात आहे.





