कोयना धरणातून ९५,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयनानगर: गेल्या तीन दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज मंगळवारी (दि. 19) रात्री ८ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे १२ फुटांवरून १३ फुटांपर्यंत उघडण्यात आले.
यामुळे धरणातून थेट ९३,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. याशिवाय, धरण पायथ्यावरील विद्युतगृहातील दोन्ही युनिटमधून २,१०० क्युसेक पाणी सोडले जात असल्याने नदीपात्रात एकूण ९५,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
या वाढत्या विसर्गामुळे पाटण तालुक्यासह कोयना नदीच्या काठावरील परिसर जलमय झाला आहे. अनेक शेतजमिनी, रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



