पालखीवर भंडाऱ्याची उधळण; वैष्णवांचा मेळा जेजुरीत मल्हारचरणी विसावला

शिवराज झगडे
जेजुरी –
मल्हारीची वारी,
माझ्या मल्हारीची वारी
आलो तुमच्या दारी,
घ्यावी आम्हा वारी बेलभडारांची
अशी ओवी गात, नाचत, भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचा पालखी सोहळा आणि वैष्णवांचा मेळा जेजुरी येथे (दि. 16) सायंकाळी शहरातील होळकर तलावानजीक असलेल्या पालखी तळावर मल्हारचरणी विसावला.
बुधवारी (दि.14) दिवेघाट पार करून माऊलींचा सोहळा सासवडच्या सोपानकाकांच्या चरणी विसावला होता. सासवडकरांचा पाहुणचार घेऊन शुक्रवारी सकाळी पालखी सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. सासवड ते जेजुरी 17 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. यादरम्यान, बोरावके मळ्यातील न्याहारी आणि शिवरीत यमाई मातेचे दर्शन, दुपारचे भोजन आणि विसावा घेतला. पहाटेपासूनच सासवड- जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. जेजुरीचा मल्हारगड नजरेच्या टप्प्यात येताच येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट, असा जयघोष वैष्णवांमधून दुमदुमला होता. सायंकाळी पाचच्या दरम्यान माऊलींच्या पालखी सोहळ्याने जेजुरी शहरात प्रवेश केला. पालखी रथापुढे 27 दिंड्या तर मागे 230 हून अधिक दिंड्या होत्या.
यावेळी मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, अभिजित देवकाते, सौन्दड़े, व्यवस्थापक सतीश घाडगे, संतोष खोमणे आदींसह जेजुरी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी सोहळ्याचे स्वागत केले. कडेपठार कमानीसमोर माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, रवी जोशी, महेश काळे, गणेश आगलावे, उद्योजक ऋषिकेश दरेकर, विजय झगडे, सुशील राऊत, अमोल माळवदकर, हरिभाऊ काकडे, माजी विश्वस्त शिवराज झगडे आदींनी पालखी सोहळा व वैष्णव बांधवांवर पुष्पवृष्टी व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
भंडाऱ्याची उधळण, सदानंदाचा येळकोट
जेजुरीचा खंडेरायांच्या धार्मिक विधी रूढी संस्कार परंपरेमध्ये हळद भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे. आळंदी- पंढरपूर मार्गावर असलेली जेजुरी आणि तेथील कुलदैवत खंडेरायाचे दर्शन म्हणजे शैव आणि वैष्णव यांचा मिलापच. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून वारीमध्ये सहभागी झालेले वैष्णव भंडाऱ्याची उधळण करीत होते. भंडारा कपाळी लावत भक्तिभावाने आपली भोळीभाबडी श्रद्धा अर्पण करताना दिसून येत होते. सोहळ्यात भंडाऱ्याची मुक्त उधळण होताना खंडेरायाचे सोनपिवळे लेणं अंगावर घेऊन वैष्णव बांधव नाचत गात तल्लीन झाले होते.





