वाघोलीचा भैरवनाथ केसरी बैलगाडा घाट सज्ज; ९ फेब्रुवारीला रंगणार शर्यतींचा थरार

वाघोली : वाघोली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतीसाठी बाईफ रोड येथील फकीरबाबा बाबा वाडा येथे उभारण्यात आलेला घाट सज्ज झाला असून रविवारी (दि. ९) पासून बैलगाडा शर्यतींना सुरुवात होणार आहे. ९, १०, ११ व १४ फेब्रुवारी असे चार दिवस बैलगाडा शर्यती होणार आहेत.
बैलगाडा शर्यतींचे टोकन काढण्यात आले असून सहभागी बैलगाडा पळविण्यासंदर्भात दिवस, वेळ, नंबर ठरवून देण्यात आले आहे. रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत भैरवनाथ मंदिर येथे निशाण पूजन तसेच घाटाचे पूजन केले जाणार आहे. मानाचा बैलगाडा पळविल्यानंतर नियमित बैलगाडा शर्यतींना सुरुवात होणार आहे.
फायनलमधील एक नंबरसाठी महिंद्रा थार गाडी, दोन नंबरसाठी ट्रॅक्टर, तीन नंबरसाठी बुलेट गाडी असणार आहे. त्याचबरोबर स्प्लेंडर, फ्रीज, टीव्ही अशी बक्षिसे बैलगाडा विजेत्यांना असणार आहेत. यासह विजेत्या बैलगाड्यांवर लाखो रुपयांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.




