Junnar News : शर्यतप्रेमींसाठी आनंदाची बातमी! उंचखडकच्या भव्य घाटात ‘या’ तारखेला सुटणार बैलगाडे; पाहा सविस्तर नियोजन
Junnar News : २६ फेब्रुवारीला मंदिरात लकी ड्रॉ पद्धतीने टोकन वाटप; जुन्नर, आंबेगावसह ५ तालुक्यांतील बैलगाडा मालकांचा सहभाग वाढणार.

Junnar News – उंचखडक येथील श्रीभैरवनाथ यात्रौत्सवाच्या निमित्ताने सोमवार, दि. २ मार्चपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या भव्य बैलगाडा शर्यती मंगळवार, दि. ३ आणि बुधवार, दि. ४ मार्च रोजी पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख रुपये असून, घाटाचा महाराजा किताब जिंकणाऱ्या बैलगाड्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.
यात्रौत्सवाची सुरुवात श्रींची महापूजा, मांडव डहाळे आणि काठी पालखी सोहळ्याने होईल. बैलगाडा शर्यतींमध्ये द्वितीय क्रमांकास ७५ हजार, तृतीय क्रमांकास ५० हजार आणि चतुर्थ क्रमांकास २५ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय दररोज फायनलमध्ये येणाऱ्या बैलगाड्यांसाठी मोटारसायकल, रोख रक्कमेची बक्षिसे आणि घाटाचा राजासाठी ११ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या स्पर्धेसाठी टोकन वाटप गुरुवार, दि. २६ रोजी सकाळी १० वाजता भैरवनाथ मंदिरात लकी ड्रॉ पद्धतीने केले जाईल. बैलगाडा शर्यतींसोबतच करमणुकीसाठी पहिल्या दिवशी लावण्य चंद्रा ऑर्केस्ट्रा आणि दुसऱ्या दिवशी मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे करवंडीकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे.
उंचखडक येथील यात्रेचे नियोजन आणि प्रशस्त घाटाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात असल्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड आणि पारनेरसह अनेक तालुक्यांतून हजारो प्रेक्षक व बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय हाडवळे, उपाध्यक्ष भाऊ कणसे, खजिनदार बी.टी. डुंबरे आणि सचिव सयाजी हाडवळे यांच्यासह समस्त ग्रामस्थ या सोहळ्याची तयारी करत आहेत.





