सातारकरांनो सावधान! शहरात पुन्हा सक्रिय झालीय ‘ती’ टोळी; एकाच दिवसात ३ महिलांना गंडा

प्रभात वृत्तसेवा
सातारा – शहरात एका दिवसात तीन वृद्ध महिलांना तोतया पोलिसांनी हजारो रुपयांचा गंडा घातला. पोलीस असल्याचे सांगत विश्वास संपादन करुन सोन्याचे दागिने हातचलाखी करुन नेले. याप्रकरणी शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील कमानी हौद येथे बुधवार दि. 10 रोजी दुपारच्या सुमारास मंगल सदानंद वंजारी (वय 66, रा. गुरुवार पेठ सातारा) यांना दोन व्यक्तींनी अडवले. त्यांना पोलीस असल्याचे सांगत विश्वासात घेतले. त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत ते निघून गेले.
याच दिवशी सोमवार व शनिवार पेठ येथे दोन वृद्ध महिलांना पोलीस असल्याचे सांगून सोन्याच्या बांगड्या व मंगळसूत्र असा दोन लाखांचा ऐवज हातोहात लंपास केला.या घटना पाहता तोतया पोलीस पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा या घटना घडत असल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी होत आहे.
तसेच वृद्धांनी एकटे प्रवास करताना गरजेपेक्षा जास्त पैसे जवळ ठेवू नयेत, दागिने घालून घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहेत. वृद्धांना डोळ्यांनी कमी दिसते, पळता येत नाही ही बाब तोतया पोलिसांच्या पचनी पडली आहे. यामुळे ते फायदा घेत असून वृद्धांचे मोठे नुकसान होत आहे.
पोलीस दागिने, पैसे मागतात का…
पोलीस हे नाव जरी ऐकले तरी अनेकांना आदरयुक्त भीती वाटते. सुरक्षा ते अडचणी सोडवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पोलिसांच्या खांद्यावर असतात. पोलीस 24 तास लोकांच्या संपर्कात असल्याने त्यांचे नाव जरी काढले तरी लगेच विश्वास बसतो.
यांचाच फायदा तोतया पोलिसांनी घेतला आहे. ते वृद्धांना पोलीस असल्याचे सांगून विश्वास संपादन करतात. परंतु, पोलीस हे दागिने व पैसे कधीही मागत नाहीत, हे आता वृद्धांनी लक्षात घेऊन तोतया पोलिसांच्या दिशाभूलीला फसू नये.





