Ganeshotsav 2026: डीजेच्या दणदणाटापासून सावधान!
Ganeshotsav 2026: काळजी घेण्याचे डॉ. श्यामसुंदर सोनावणे यांचे आवाहन

पिंपरी – गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन भाजप इंडस्ट्रियल हेल्थ मेडिकल सेल महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा मेस्पा डॉक्टर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर सोनावणे यांनी केले.
दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात गणरायाच्या दर्शनासाठी आले असता डॉ. सोनावणे यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषण, ‘डीजे’चा आरोग्यावर होणारा परिणाम तसेच वाढत्या एच१एन१च्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.
गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः पेसमेकर बसविलेले तसेच हृदयाची गती नियंत्रणात नसलेल्या नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे डॉ. सोनावणे यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात एच१एन१चे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ताप कमी होत नसल्यास, अनेक दिवस अस्वस्थता जाणवत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सव, वारी यांसारख्या मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये वैद्यकीय मदतीची व्यवस्था आणि स्वयंसेवकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सीपीआर प्रशिक्षणाचे उपक्रम राबविले जातात. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला योग्य प्राथमिक मदत मिळणे आणि वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दगडूशेठ गणपती परिसरात दोन आयसीयू बेड व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा:





