Ganeshotsav : गणेशोत्सव बंदोबस्तात २८ ‘विशेष पोलीस अधिकारी’; पोलिसांना संस्कार प्रतिष्ठानची १८ वर्षांपासून साथ
Ganeshotsav : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शन

पिंपरी – गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव बंदोबस्तासाठी संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहराचे २८ सभासद ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून पोलिसांना मदत करत आहेत.
गेल्या १८ वर्षांपासून संस्कार प्रतिष्ठानकडून गणेशोत्सव काळात पोलिसांना सहकार्य केले जात आहे. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या या विशेष पोलीस अधिकाऱ्यांना चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या हस्ते टी-शर्ट व टोपीचे वाटप करण्यात आले. यावेळी गणेशोत्सव काळातील बंदोबस्त, गर्दीचे नियोजन तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन होणार असल्याने विसर्जन मिरवणुकीदरम्यान विशेष दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे, असे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांनी केले.
संस्कार प्रतिष्ठानचे २८ सभासद गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून बंदोबस्तात सहभागी होत आहेत. गर्दीचे व्यवस्थापन, नागरिकांना आवश्यक सूचना देणे आणि उत्सवादरम्यान शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी ते पोलिसांना सहकार्य करणार आहेत.
संस्कार प्रतिष्ठानच्या या १८ वर्षांच्या सहकार्याबद्दल पोलीस प्रशासनाकडूनही कौतुक व्यक्त करण्यात आले. यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्यासह प्रतिष्ठानचे सभासद उपस्थित होते. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त राबविण्यात येत आहे.





