Pavana River: पवना नदी पुन्हा फेसाळली प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
Pavana River: नदी स्वच्छतेसाठी महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीपात्रात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेस साचल्याचे मंगळवारी (दि. २२) पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. नदीच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा फेस जमा झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरातील विविध भागांतून सांडपाणी नदीत मिसळत असल्याने पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. नदीपात्रात साचलेला फेस हा पाण्यातील सांडपाणी, रासायनिक घटक किंवा इतर प्रदूषकांमुळे निर्माण झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवना नदी ही शहराच्या दृष्टीने महत्त्वाची जलवाहिनी आहे.
नदीपात्रात वारंवार फेस दिसून येत असल्याने नदी स्वच्छतेसाठी महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नदीमध्ये थेट किंवा प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात नाही ना, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तातडीने प्रयोगशाळेत तपासणी करावी, फेस निर्माण होण्यामागील नेमके कारण शोधावे आणि दोषी आस्थापनांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
पवना नदी प्रदूषणाबाबत यापूर्वीही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे नदी पुन्हा फेसाळल्याने केवळ तात्पुरती स्वच्छता न करता प्रदूषणाचा स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकतेच पवना नदीमध्ये रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे चार आस्थापनांना कोट्यवधी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरातील पवना नदीची गटारगंगा कायम आहे.
Satara: जिल्हा परिषदेत गणेशोत्सवाची भक्तिमय सांगता, कृत्रिम तलावात विसर्जन; ढोल वादन करत डॉ. प्रिया शिंदे यांचा मिरवणुकीत सहभाग





