Mayawati : “कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षापासून सावध राहा”; मायावती यांचा बहुजनांना सल्ला

Mayawati – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवर दलितांविरुद्ध भेदभाव केल्याबद्दल निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला आहे की या राजकीय पक्षांनी संकुचित मतपेढीच्या राजकारणासाठी लोकांना वारंवार फसवले आहे. आपण अशा व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे.
सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एका लांबलचक पोस्टमध्ये मायावती यांनी हल्लाबोल केला. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की विरोधी पक्षांचा, विशेषतः समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा, बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्याबद्दलचा दृष्टिकोन सर्वज्ञात आहे. कांशीराम यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमान चळवळीला पुनरुज्जीवित केले आणि नवीन प्रेरणा दिली.
मात्र या दोन पक्षांना कांशीराम यांच्याबद्दल कायमच द्वेष राहीला आहे. आता ९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चर्चासत्र आयोजित करण्याची सपा प्रमुखांची घोषणा ही घोर फसवणूक आहे आणि तोंडात राम आणि काखेत चाकू या म्हणीचे ते स्पष्ट प्रतिबिंब आहे. सपाने कांशीराम जिवंत असताना त्यांच्या पक्षाशी विश्वासघात केला आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या चळवळीला सतत कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.
बसपाच्या सरकारकडून कांशीराम यांच्या नावावर असंख्य विद्यापीठे, महाविद्यालये, रुग्णालये आणि इतर संस्था स्थापन करण्यात आल्या. बहुजनांना सत्ताधारी वर्ग म्हणून स्थापित करण्यासाठी उत्तर प्रदेशात बसपा सरकारने अथक प्रयत्न केले. मात्र नंतरच्या सपा सरकारने त्यापैकी बहुतेकांचे नाव बदलले. हे त्यांचे दलितविरोधी डावपेच, चारित्र्य आणि चेहरा उघडपणे दाखवणारे आहे.
एवढेच नाही तर संपूर्ण देशाने, विशेषतः उत्तर प्रदेशने कांशीराम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी सपा सरकारने उत्तर प्रदेशात एकही दिवसाचा राज्य शोक जाहीर केला नाही. त्याचप्रमाणे, केंद्रातील तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या सरकारनेही एकही दिवस राष्ट्रीय शोक जाहीर केला नाही.
तरीही, वेळोवेळी, संकुचित राजकारण आणि मतांसाठी, सपा आणि काँग्रेस इत्यादींनी कांशीराम यांना केवळ दिखावा आणि फसवणूक म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सपा आणि काँग्रेससारख्या अशा दिशाभूल करणाऱ्या, जातीयवादी आणि संकुचित विचारसरणीच्या पक्षांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे.





