Pune District : बेट भाग चोरट्यांच्या विळख्यात : पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
Pune District : बबन जाधव यांच्या पेशवा कलेक्शन दुकानाचेही शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला, पण येथेही चोरट्यांचा डाव फसला.

शिरूर : शिरूर तालुक्यातील बेट भागात (दि.२९) रोजी पहाटे कवठे येमाई, मलठण आणि शिंगाडवाडी या तीन गावांमध्ये एकाच रात्रीत दुकान आणि घरफोडी झाल्याने पोलीस यंत्रणेलाच खुले आव्हान दिले आहे.
दोन दुकाने फोडून रोकड लंपास केली, एका दुकानात चोरीचा प्रयत्न झाला, मलठण येथे बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सलग घटनांमुळे बेट भागातील व्यापारी, शेतकरी, नागरिकांमध्ये प्रचंड भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावरील न्यू जय मल्हार मेडिकल या सागर करंडे यांच्या दुकानाचे मुख्य कुलूप उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यावरून आरोपींचा शोध सुरू आहे.
तेजस दुडे यांच्या कुंडाई मोबाईल शॉपीचे शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र दुकानात प्रवेश करण्यात त्यांना अपयश आले. बबन जाधव यांच्या पेशवा कलेक्शन दुकानाचेही शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला, पण येथेही चोरट्यांचा डाव फसला. दरम्यान, शिंगाडवाडी येथील जय मल्हार ॲग्रो कृषी साहित्य केंद्र व किराणा दुकान फोडून चोरट्यांनी तेथूनही ऐवज लंपास केला. चोरीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
मलठण-पाबळ रस्त्यावरील ॲड. प्रताप शिंदे यांच्या बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शिंदे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने घरातील किती ऐवज चोरीला गेल्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी पिंपरखेड येथे दोन रोहित्रे फोडून शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली होती. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता तीन गावांमध्ये सलग चोरीच्या घटनांनी बेट भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





