BEST Election Result : बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय घडलं?

मुंबई : दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत मध्यरात्रीच्या पुन्हा मतमोजणीने निकालाला अनपेक्षित वळण मिळाले आहे. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता न आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मोठा धक्का बसला आहे.
तर शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांसह सत्ता काबीज केली आहे. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावे लागले. ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या आगामी राजकीय रणनीतीसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती, परंतु त्यांच्या पराभवाने मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री पुन्हा मतं मोजणी
18 ऑगस्ट रोजी झालेल्या या निवडणुकीचे निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाले. मुसळधार पावसामुळे मतमोजणीला उशीर झाला होता. सुरुवातीला महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला 9 जागांवर विजय मिळाला होता, परंतु मध्यरात्री पुन्हा मतमोजणी झाल्यावर शशांक राव पॅनेलच्या खात्यात आणखी दोन जागा जमा झाल्या.
यामुळे शशांक राव यांच्या पॅनेलने एकूण 21 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली, तर महायुतीला 7 जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला मात्र एकही जागा मिळाली नाही, ज्यामुळे त्यांच्या गटाची गेल्या 9 वर्षांपासूनची बेस्ट पतपेढीवरील सत्ता संपुष्टात आली.
-शशांक राव पॅनल : 14 जागा
1. आंबेकर मिलिंद शामराव
2. आंब्रे संजय तुकाराम
3. जाधव प्रकाश प्रताप
4. जाधव शिवाजी विठ्ठलराव
5. अम्मुंडकर शशिकांत शांताराम
6. खरमाटे शिवाजी विश्वनाथ
7. भिसे उज्वल मधुकर
8. धेंडे मधुसूदन विठ्ठल
9. कोरे नितीन गजानन
10. किरात संदीप अशोक
11. डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव)
12. धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/जमाती)
13. चांगण किरण रावसाहेब (भटक्या विमुक्त जाती)
14. शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय)
-महायुती (सहकार समृद्धी पॅनल) : 7 जागा
1. रामचंद्र बागवे
2. संतोष बेंद्रे
3. संतोष चतुर
4. राजेंद्र गोरे
5. विजयकुमार कानडे
6. रोहित केणी (महिला राखीव)
7. रोहिणी बाईत
– ठाकरे बंधू (उत्कर्ष पॅनल) : 0 जागा
ठाकरे बंधूंना धक्का
ठाकरे बंधूंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांच्या युतीतून उत्कर्ष पॅनेल उभे केले होते. दुसरीकडे, महायुतीने प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळणे हा त्यांच्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.




