Stokes Archer Fight : लाइव्ह सामन्यात स्टोक्स-ऑर्चरमध्ये जुंपली! जोरदार वादावादीचा VIDEO व्हायरल

Stokes Archer Fight video viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘अॅशेस’ मालिकेतील तिसरा कसोटी सामना सध्या ॲडलेडच्या मैदानावर रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मात्र, खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची स्थिती अत्यंत नाजूक असून संघ पराभवाच्या छायेत दिसत आहे. विशेष म्हणजे, मैदानावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात झालेल्या तीव्र वादाने या सामन्याला वेगळेच वळण दिले आहे.
स्टोक्स-आर्चर यांच्यात मैदानातच रंगला कलगीतुरा –
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान क्षेत्ररक्षणावरून बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात बाचाबाची झाली. आर्चर कर्णधाराने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर समाधानी नव्हता, ज्यावरून त्याने नाराजी व्यक्त केली. आर्चरची ही वागणूक स्टोक्सला रुचली नाही आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
Ben Stokes saying to Archer
Mate don’t complain about the field placings when you bowl 💩
“Bowl on the stumps” he says and yep and look what happens #ashes25@7Cricket #AUSvsENG pic.twitter.com/RFaoSnH02Z— Bernie Coen (@berniecoen) December 17, 2025
रागाच्या भरात स्टोक्स आर्चरला सुनावताना म्हणाला, “जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता, तेव्हा क्षेत्ररक्षणाबद्दल तक्रार करू नका. फक्त स्टंप्सवर मारा करण्याकडे लक्ष द्या.” परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून संघातील इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IND vs SA : ‘तीन पोती गहू विकून आलो होतो…’, सामना रद्द झाल्यानंतर संतापलेल्या चाहत्याचा VIDEO व्हायरल
इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली –
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३७१ धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर जॅक क्राउली (९) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ऑली पोप (३), जो रूट (१९) आणि बेन डकेट (२९) हे ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतले. ७१ धावांवर इंग्लंडने आपले ४ महत्त्वाचे गडी गमावले होते.
हॅरी ब्रूक (४५) आणि जेमी स्मिथ (२२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. विल जॅक्स ६ धावांवर बाद झाला, तर ब्रायडन कार्सला खातेही उघडता आले नाही. स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे फलंदाज हतबल दिसले.
हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहचा विमानतळावर दिसला ‘अँग्री’ अवतार! फोन हिसकावत फॅनला शिकवला धडा, पाहा VIDEO
विजयासाठी मोठी कसरत –
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेन स्टोक्स (४५*) आणि जोफ्रा आर्चर (३०*) यांनी संयमी फलंदाजी करत ४५ धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंड अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा १५८ धावांनी मागे असून त्यांचे केवळ २ गडी शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया हा सामना लवकर संपवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल, तर स्टोक्स आणि आर्चरसमोर इंग्लंडचा पराभव टाळण्याचे मोठे आव्हान असेल.





