भावाच्या प्रचारासाठी सरसावल्या लाडक्या बहिणी; सुनील कांबळे यांच्या पदयात्रेत स्त्री शक्तीचे दर्शन

पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचाराची धुरा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी हाती घेतली आहे. सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी प्रीती कांबळे यांच्यासह भाजपच्या माजी शहर महिलाध्यक्ष अर्चना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची पदयात्रा काढण्यात आली.
या मध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी महायुती सरकारचा लाडका भाऊ, आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. काशेवाडी भागात ही पदयात्रा काढण्यात आली होती. महिलांचा त्याला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार कांबळे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची, अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण केल्याची आणि मतदारसंघाबद्दलच्या व्हिजनची माहिती यावेळी प्रीती कांबळे यांनी मतदारांना दिली. विकासाच्या मार्गावर असलेल्या मतदारसंघाचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी, प्रत्येक अडीअडचणीला धाऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार यावेळी पदयात्रेतील सहभागी महिलांनी केला.
तर, मतदारसंघातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो, महिलांचे प्रश्न सोडवण्यासा नेहमीच अग्रक्रम दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील ३७ हजारांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत, म्हणजे एवढे कुटुंब महायुतीशी जोडले गेली आहेत.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा संकल्प असल्याचे आश्वासन यावेळी उमेदवार सुनील कांबळे यांनी या महिलांना दिले.





