लाडक्या बहिणींची फसवणूक ! २१०० रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग, काय घडलं पाहा…

Ladki Bahini Yojana – लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीचे सरकार विक्रमी बहुमताने पुन्हा सत्तेत आले, ती योजना सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलीच गाजते आहे. निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याची विचारणा विरोधकांकडून सातत्याने होत होती.
मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यापासून तर याबाबत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. बुधवारी देखील सभागृहात हा मुद्दा गाजला. या चर्चेदरम्यान लाडक्या बहिणींची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी करत सभात्याग केला. तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री हे लवकरच विचारपूर्वक निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिले.
अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यात आज महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महायुती सरकारने शेतक-यांची कर्जमाफी केली नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा… कंत्राटदार तुपाशी… शेतकरी उपाशी…, अशा घोषणा देत विरोधकांनी आंदोलन केले.
अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले, पण त्यांना मानधन मिळाले नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार, या अधिवेशनात तो होईल का, याच मुद्द्याला धरून उत्तर द्या, असा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केला.
यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, आम्ही आश्वासन नक्की दिले होते आणि त्याबाबत २१०० रुपये कधी द्यायचे? त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री हे लवकरच निर्णय घेतील. तसेच 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे.
नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिल्यास त्यात नमूद केले आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून देत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.





