ITR Filing: ‘टॅक्स’ संबंधित ‘हे’ काम केले का? शेवटचे 10 दिवस बाकी; अन्यथा भरावा लागेल दंड

Belated ITR Filing Deadline : तुम्ही जर अद्याप आर्थिक वर्ष 2023-24 साठीचे इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल केले नसल्यास ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करायला हवी. अन्यथा तुम्हाला अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. याआधी आयकर विभागाकडून आयटीआर भरण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्येही आयटीआर भरला नसल्यास विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2024 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
विलंब शुल्कासह आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 दिवस आहेत. पुढील 10 दिवसात आयटीआर न भरल्यास 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.
31 डिसेंबरपर्यंत भरा आयटीआर
तुम्ही जर आर्थिक वर्ष 2023-24 (असेसमेंट वर्ष 2024-25) साठीची आयटीआर भरण्याची अंतिम तारीख चुकवली असल्यास पुन्हा एकदा संधी आहे. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत हे काम करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला विलंब शुल्क द्यावे लागेल.
तुम्ही जर आता आयटीआर भरत असाल व तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास 1 हजार रुपये विलंब शुल्क द्यावे लागेल. जर उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास शुल्काची रक्कम 5 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. तसेच, विलंब शुल्क व देय रक्कम भरून प्रक्रिया पूर्ण केल्यावर 30 दिवसांच्या आत व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावे.
आयटीआर भरण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
- यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आयकर विभागाची वेबसाइटवर जावे लागेल.
- त्यानंतर e-Filing Portal वर पॅनच्या मदतीने लॉग इन करा.
- आता तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्मची निवड करा.
- पुढे FY2023-24साठी असेसमेंट वर्ष 2024-25 निवडा.
- यानंतर तुम्हाला उत्पन्न, कर सूट व इतर माहिती द्यावी लागेल.
- माहितीसोबतच तुम्हाला कर रक्कम व दंडाची रक्कम भरावी लागेल.
- सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 30 दिवसांच्या आत आयटीआर व्हेरिफाइड करा.
लक्षात घ्या की, 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. तुमच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यामुळे मुदतीपूर्वी आयटीआर भरणे कधीही फायद्याचे ठरते.




