“विधानसभेपूर्वी दिल्लीत दोघांनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी दिलेली”; शरद पवारांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटली आणि त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, “विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं.”
“त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु असं ठरवलं,” असा खुलासा शरद पवार यांनी केला. मात्र ही दोन लोक कोण? हि चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. Sharad Pawar |
….कारण नसताना, चर्चेचा विषय केला
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांच्या आसनव्यवस्थेवरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांनी लक्ष केले. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याला मी हजर होतो. मी कालपासून बघतोय, उद्धव ठाकरे कुठे बसले? यावर चर्चा सुरु आहे. पावर पॉइंट प्रेझेंटेशन होतं. ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हटल्यावर सिनेमा बघताना ज्या प्रमाणे आपण पहिल्या रांगेत बसत नाही, आपण पाठीमागे बसतो त्याच पद्धतीने मी स्वत: आणि फारुख अब्दुल्लाह शेवटी बसलेलो आणि आमच्याजवळ उद्धव ठाकरे होते, कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. दुर्देवाने उद्धव ठकरे कुठे बसले? हा कारण नसताना, चर्चेचा विषय केला,” असे शरद पवार म्हणाले. Sharad Pawar |
हेही वाचा :





