राहुल गांधींच्या आरोपांची निवडणूक आयोगाने घेतली दखल; ‘मत चोरी’ची चौकशी करण्याचे आदेश

बंगळुरू – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात लाखभर मतांची चोरी झाल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही.अंबुकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
राहुल यांनी गुरूवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांमधील अनियमिततांचे पुरावे उपलब्ध असल्याची भूमिका मांडली. त्यांनी ऑनलाइन सादरीकरण करत कर्नाटकमधील उदाहरण दिले. त्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने अंबुकुमार यांची भेट घेतली.
राहुल यांच्या दाव्याच्या पुष्टीसाठी शपथपत्र सादर करण्याची सूचना अंबुकुमार यांनी केली. चौकशीही सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याविषयी समाधान वाटते, असे नंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले.
कागदपत्रे आणि पुरावे मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी नमूद केले. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी बंगळुरू मध्य या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा राहुल यांचा दावा आहे. त्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी लाखभर बनावट मतदार कसे जोडण्यात आले याविषयीची आकडेवारी सादर केली.





