Beed-Pune Railway : बीड-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू; विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांना मोठा दिलासा
Beed-Pune Railway : बीड-पुणे थेट दैनंदिन रेल्वे सेवा सुरू झाली. नवीन रेल्वेमुळे शिक्षण, रोजगार, व्यापार, वैद्यकीय सेवा आणि पर्यटनासाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

Beed-Pune Railway : मराठवाड्याच्या रेल्वे संपर्काला नवे बळ मिळाले आहे. अहिल्यानगर-बीड नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बीड-पुणे उद्घाटन विशेष रेल्वेला गुरुवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही सेवा पुढे गाडी क्रमांक ११४३३/११४३४ पुणे-बीड-पुणे दैनिक एक्स्प्रेस म्हणून नियमित धावणार आहे. त्यामुळे बीड प्रथमच पुण्याशी थेट दैनंदिन रेल्वेने जोडले जाणार आहे.
या रेल्वेमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण, रोजगार, उद्योग, वैद्यकीय सेवा आणि व्यापारासाठीचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे, व्यापारी, भाविक आणि रुग्णांना याचा फायदा होईल. आतापर्यंत बीडमधील प्रवाशांना पुण्यासाठी प्रामुख्याने एसटी आणि खासगी बसवर अवलंबून राहावे लागत होते.
पुणे-बीड रस्त्याचे अंतर सुमारे २४५ किलोमीटर असून बसने प्रवासाला साधारण सात तास लागतात. एसटीचे भाडे प्रकारानुसार सुमारे ४५० रुपयांपासून, तर खासगी बसचे भाडे ६०० ते १,२०० रुपयांपर्यंत आहे. रेल्वेमार्गाचे अंतर सुमारे ३२० किलोमीटर आहे. रेल्वेचे सामान्य श्रेणीचे भाडे सुमारे १४० रुपये, द्वितीय आसनाचे १५० ते २०० रुपये, शयनयानाचे सुमारे २३० रुपये आणि वातानुकूलित तृतीय श्रेणीचे ६०० ते ८०० रुपये असण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेमुळे होणारे प्रमुख फायदे –
शिक्षण व रोजगार: पुण्यातील शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी प्रवास सुलभ होणार.
व्यापार व पर्यटन: कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला तसेच परळी वैजनाथ, अंबाजोगाई आणि कंकालेश्वर यांसारख्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार.
वैद्यकीय सेवा: पुण्यातील वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना पर्यायी प्रवासाची सुविधा मिळणार.
मुंबईशी संपर्क: पुणे जंक्शनमार्गे मुंबईसह इतर शहरांशी रेल्वे संपर्क अधिक सुलभ होणार.
उद्घाटन विशेष रेल्वेला १५ डबे –
गाडी क्रमांक ०१४०१ उद्घाटन विशेष रेल्वेला अमळनेर भांड्याचे, नवी आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी येथे थांबे आहेत. या गाडीत दोन वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असे एकूण १५ डबे आहेत. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पातील अहिल्यानगर-बीड विभाग सुरू झाल्यानंतर ही सेवा प्रत्यक्षात आली आहे.





