बीड पोलीस अॅक्शनमोडमध्ये; आणखी 6 आरोपींविरोधात मकोका

बीड – बीड जिल्ह्याच्या मस्सोजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर बीडसह राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे बीडमधील आणखी 6 जणांवर मकोका कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेची ही आठवले गँग आहे. बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे.
या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. विश्वास दादाराव डोंगरे असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. डोंगरे आणि आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. यामध्ये विश्वास दादाराव डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. आता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, या प्रकरणातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.





