Beed Bus Accident : बीड जिल्ह्यात एका खाजगी प्रवासी बसचा टायर फुटून बस उलटली आणि काही वेळातच बसला आग लागल्याने या घटनेत २० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे अडीच वाजता कैज तालुक्यात मांजर्सुंबा-अंबाजोगाई रस्त्यावरील सुरानी गावाजवळ घडली आहे. या जखमींमध्ये एका ३ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. पोलिसांच्या माहीतीनुसार, २८ प्रवासी घेऊन जाणारी ही बस जळगावहून लातूरच्या दिशेने निघाली होती. एका तीव्र वळणावर बसचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने रस्त्याच्या कडेची संरक्षक रेलिंग तोडली आणि ती रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका खड्ड्यात कोसळली. रस्त्यावरील इतर प्रवाशांनी या अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच या बसला भीषण आग लागली. या घटनेत २० प्रवासी जखमी झाले असून, कैज पोलीसांनी सहा रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी ११ प्रवाशांना नंतर अंबाजोगाई येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तर उर्वरित नऊ प्रवाशांना लातूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. तसेच, ही आग जवळच्या एका शेतातही पसरली, ज्यामुळे आंबा, जांभूळ, चिंच, बोर आणि लिंबू यांची झाडे जळून नष्ट झाली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.