Kiran Ahir : “माझ्या वडिलांनी पक्ष बदलल्यामुळे….”; सचिन अहिरांच्या लेकीचा व्हिडिओ चर्चेत, आदित्य ठाकरेचं नाव घेतलं अन्…
Kiran Ahir : किरण अहिर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला भावनिक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Kiran Ahir : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नुकताच मोठा धक्का बसला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
या राजकीय घडामोडीनंतर आता सचिन अहिर यांच्या कन्या किरण अहिर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला भावनिक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हिडीओमध्ये किरण अहिर यांनी वडिलांवर होत असलेल्या टीका आणि ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्या वडिलांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांच्यावर टीका आणि तिरस्कार केला जात आहे. मात्र २०१९ मध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी पक्षात प्रवेश केला आणि पूर्ण निष्ठेने काम केले. आज त्याच कामाचं फळ त्यांना मिळालं आहे,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी वडिलांवर होत असलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. “पक्षाने खूप काही दिले, याचा आम्ही आदर करतो. पण राजकारण म्हणजे केवळ पक्षनिष्ठा नसून जनसेवा आहे. माझ्या वडिलांनी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले. त्यामुळे आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे,” असे किरण अहिर यांनी सांगितले.
View this post on Instagram
त्यांनी पुढे सांगितले की, सचिन अहिर यांनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला होता आणि त्यांना पूर्ण साथ दिली होती. त्यामुळे आता केवळ पक्षबदलाच्या कारणावरून त्यांच्यावर होत असलेली टीका योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किरण अहिर यांचा हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सचिन अहिर यांच्याविषयी
सचिन अहिर हे महाराष्ट्रातील अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पक्षांमध्ये काम केले असून २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असून त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाचे विधान परिषदेतील बळ वाढले असून ठाकरे गटाला मात्र एक अनुभवी नेता गमवावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोण आहेत किरण अहिर?
किरण अहिर या विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या कन्या आहेत. किरण अहिर यांनी Les Roches International School of Hotel Management येथे शिक्षण घेतले असून, त्या मुंबईतील The Art Lab Patisserie and Bakery या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती त्यांच्या व्यावसायिक प्रोफाइलवरून मिळते. त्या राजकारणात सक्रिय नसल्या तरी शिक्षण आणि उद्योजकतेमुळे ओळखल्या जातात.
हेही वाचा : Gauri Sprat : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चं मन जिंकलं! आमिर खान पुन्हा विवाहबंधनात अडणार; कोण आहे गौरी स्प्रॅट?





