नगर, (प्रतिनिधी) – मागील भांडणाच्या कारणातून चुलत्यासह तीन पुतणे व भावजाईला १३ ते १५ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना वाघमळा, करंदीकर हॉस्पिटलच्या मागे घडली. मारहाणीत जखमी झालेले भिम बाबुराव ढगे (वय 63) यांनी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. रजनिश अभिजित वाघ, दीपक सर्जेराव कावळे, अभिजित सुरेश वाघ (पत्ता नाही) व इतर 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ढगे त्यांच्या घरी असताना त्यांना भांडणाचा आवाज आल्याने ते घराबाहेर आले. त्यांचा पुतण्या जगदीश ढगे यांना मारहाण होत होती. त्यांना मारहाण करू नका, असे म्हणून फिर्यादीच्या भावजई राजश्री ढगे मध्ये आल्या असता त्यांना शिवीगाळ करून ढकलून दिले. बाजूला उभे असलेले त्यांचे पुतणे ज्ञानेश्वर विश्वास ढगे, ओंकार लक्ष्मण ढगे यांना लाकडी दांडके, रॉडने मारहाण केली. जमावाने फिर्यादीला मारहाण करून जखमी केले. त्यातील एकाने राजश्री यांच्या गळ्यातील १२ ग्रॅमचे मिनी गंठण तोडून नेले. परत आमच्या नादाला लागले व पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.