पिंपरी | एटीएम वापरताना बाळगा सावधगिरी दुर्लक्ष होताच बॅंक खाते रिकामे

पिंपरी, (प्रतिनिधी) – एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून आरोपीने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये काढले. ही घटना नुकतीच देहूगाव येथील युनियन बँकेच्या एटीएममध्ये शुक्रवारी (दि. ५) रोजी घडली. आत्माराम कातकडे (वय ७१, रा. देहूरोड) यांच्या सोबत हा प्रकार घडला.
एटीएममधून पैसे काढताना आरोपीने एटीएमचा पिन पाहून, एटीएम कार्डची अदलाबदल करून २५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. आसाच प्रकार आपल्या सोबत घडण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच एटीएममधून पैसे काढताना सावधगिरी बाळगने गरजेचे आहे.
प्रवासात नागरिक रोख रक्कम न ठेवता गूगल पे, एटीएमचा वापर करून आपले आथिर्क व्यवहार करत आहेत. परंतु निरक्षर अथवा ज्येष्ठ नागरिकांना या एटीएमचा वापर करता येत नसल्याने ते बहुतांश वेळ तेथे उभा असलेल्या व्यक्तींकडून आपला आथिर्क व्यवहार करून घेतात. परंतु या व्यक्ती खरेच मदत करत आहेत की आपला गैरफायदा घेत आहेत का याबाबत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
बऱ्याच वेळा मदतीच्या बहाण्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून आपले बँक खाते मोकळे केले जाते. असाचा प्रकार शुक्रवारी (दि. ५) रोजी घडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना टार्गेट केले जाते.
त्यामुळे एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा गार्ड असेल तर त्यांची मदत घेऊ शकता. परंतु अनोखळी माणसांना आपल्या एटीएमचा पिन सांगू नये. एटीएम सेंटरमधूनच फसवणूक करून चोरी करण्याचे प्रमाण वाढत असल्याने हा प्रकार रोखण्यासाठी ज्याठिकाणी एटीएम मशीन असेल, त्याठिकाणी एक सुरक्षारक्षक हवाच, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पैसे काढताना अशी घ्या काळजी
एटीएममधून पैसे काढताना सेंटरचे दार पूर्णपणे बंद ठेवा. पिन टाकताना कोणी पाहत नाही ना याची खात्री करा. एटीएममध्ये तांत्रिक अडचण असल्यास व्यवहार थांबवा. अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नका. मदत करण्याच्या बहाण्याने चोरटे एटीएम कार्ड बदलतात. त्यानंतर विविध ठिकाणी कार्ड स्वाइप करून फसवणूक करतात. नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
फसवणूक टाळण्यासाठी हे करा
जर तुम्ही नेहमी रोखीने पैसे भरतात, तर तुम्हाला दर काही दिवसांनी एटीएम कार्डमधून पैसे काढावे लागत असतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पिन ठराविक अंतराने बदलत राहिले पाहिजे. जेणेकरून तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.





