IPL 2026 Auction पूर्वी CSK च्या माजी खेळाडूला मोठा धक्का! बॉलिंग ॲक्शनवर गंभीर प्रश्न उपस्थित

BCCI warned IPL franchises for Deepak Hooda : आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी (IPL 2026 Auction) अवघे तीन दिवस शिल्लक असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा याच्या गोलंदाजी ॲक्शनवर अजूनही शंका असल्याने, लिलावात सहभागी होणाऱ्या संघांना याबाबत सावध करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने (CSK) हुड्डाला रिलीज केले होते. त्याने नुकत्याच झालेल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केली असली तरी, त्याच्या गोलंदाजी ॲक्शनवर कायम असलेल्या प्रश्नांमुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.
हुड्डाच्या ॲक्शनवर पुन्हा शंका –
Ahead of the #IPLAuction, the BCCI has intimated franchises that Deepak Hooda’s bowling action remains under the suspect category. pic.twitter.com/IivUDQWm4q
— Cricbuzz (@cricbuzz) December 13, 2025
लिलावापूर्वी तीन दिवस आधी, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना माहिती दिली आहे की, मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही दीपक हुड्डाची गोलंदाजी ॲक्शन ‘संशयास्पद श्रेणी’मध्ये आहे. हुड्डा हा पार्ट-टाइम फिरकी गोलंदाज आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती, तर या देशांतर्गत हंगामातही त्याने फक्त ६ षटके फेकली आहेत. तो अखेरचा ८ डिसेंबर रोजी झारखंडविरुद्ध गोलंदाजी करताना दिसला होता.
एका अहवालानुसार, जर हुड्डाच्या गोलंदाजी ॲक्शनवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले, तर त्याला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे, फ्रँचायझींनी त्याला अष्टपैलू म्हणून न पाहता फक्त फलंदाज म्हणून खरेदी करावी, या उद्देशाने बीसीसीआयने ही माहिती दिली आहे.
‘संशयास्पद’ यादीत इतर खेळाडू –
केवळ दीपक हुड्डाच नाही, तर इतर काही खेळाडूंच्या गोलंदाजी ॲक्शनवरही शंका व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचा २९ वर्षीय आबिद मुश्ताक, कर्नाटकाचा केएल श्रीजीत आणि मध्य प्रदेशचा ऋषभ चौहान यांचाही या यादीत समावेश आहे. केएल श्रीजीत आणि ऋषभ चौहान या दोघांवरही गेल्या वर्षी आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली होती.
दीपक हुड्डा आयपीएल २०२६ च्या लिलावात एएलवन श्रेणीचा भाग आहे आणि त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये आहे. या गटात व्यंकटेश अय्यर, वनिंदू हसरंगा आणि रचिन रवींद्र यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे.





