Rohit Sharma : रोहित-विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळणार की नाही? बीसीसीआयच्या ‘या’ बैठकीत ठरणार

२०२७ वर्ल्डकपसाठी रोडमॅप –
बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ वनडे वर्ल्डकपला अजून बराच वेळ असला तरी, रोहित आणि विराट यांच्याशी त्यांच्या भविष्याबद्दल कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. याच कारणामुळे बीसीसीआय त्यांच्या भूमिका, संघाची रणनीती आणि पुढील दोन ते तीन वर्षांचा रोडमॅप निश्चित करू इच्छिते, जेणेकरून खेळाडूंना स्पष्ट संदेश मिळू शकेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्यानंतर लगेचच विशाखापट्टणममध्ये किंवा काही दिवसांनी अहमदाबादमध्ये या बैठकीचे आयोजन केले जाईल.
बीसीसीआयने दिला महत्त्वाचा सल्ला –
या दोन्ही अनुभवी खेळाडूंना फिटनेस आणि फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला जाणार आहे. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत.
हेही वाचा – SMAT 2025 : अर्शिन-शॉची हैदराबादविरुद्ध तुफान फटकेबाजी; महाराष्ट्राचा ८ गडी राखून दणदणीत विजय!
बोर्डाच्या सूत्रांनुसार, रोहित आणि विराटसारख्या अनुभवी खेळाडूंना टीम व्यवस्थापन भविष्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवते, हे माहीत असणे आवश्यक आहे. बीसीसीआयने रोहितला फिटनेस आणि प्रदर्शनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असून, भविष्याशी संबंधित कोणतेही सार्वजनिक विधान करण्यापासून परावृत्त केले आहे.
रोहितकडून आक्रमकतेची अपेक्षा –
टीम व्यवस्थापनाला रोहितने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करावी, अशी अपेक्षा आहे, जसे त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दाखवले होते. रोहितने टॉप ऑर्डरमध्ये निर्भीडपणे फलंदाजी करावी, जेणेकरून युवा फलंदाजांसाठी मार्ग मोकळा होईल, अशी संघाची इच्छा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितने कमी धोका पत्करल्यामुळे संघ थोडा निराश झाला होता.





