BCCI New Rules : BCCI च्या नव्या फतव्यामुळे आयपीएलमध्ये खळबळ! आता ‘या’ खेळाडूंच्या वावरावर बंदी; पाळावे लागणार ‘हे’ नियम
BCCI New Rules : मैदानावरील शिस्त अधिक कडक करण्यासाठी बीसीसीआयने 'बेंच'वर बसणाऱ्या खेळाडूंसाठी नवे नियम लागू केले आहेत.

BCCI New Rules for IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १३ सामने पार पडले आहेत. मात्र, १४ व्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने नियमावलीत (MPC) मोठे बदल केले आहेत. नव्या नियमानुसार, मॅच सुरू असताना केवळ तेच १६ खेळाडू मैदानाच्या आसपास दिसू शकतील, ज्यांची नावे अधिकृत ‘टीम शीट’मध्ये समाविष्ट आहेत. या १६ खेळाडूंव्यतिरिक्त स्क्वॉडमधील इतर कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश करता येणार नाही.
ड्रिंक्स आणि मेसेज देण्यावरही निर्बंध
आतापर्यंत आपण पाहिले आहे की, डगआऊटमध्ये बसलेले राखीव खेळाडू वारंवार ड्रिंक्स, बॅट किंवा प्रशिक्षकांचा महत्त्वाचा संदेश घेऊन मैदानात जात असत. मात्र, बीसीसीआयने आता यावर स्पष्ट शब्दांत बंदी घातली आहे. केवळ नामित १६ खेळाडूच ही कामे करू शकतील. तसेच, बाउंड्री लाईन आणि एलईडी जाहिरात बोर्डाच्या मध्ये अकारण फिरणाऱ्या खेळाडूंना आता डगआऊटमध्येच बसून राहावे लागेल.
बाउंड्री जवळ केवळ ५ जणांना परवानगी –
बीसीसीआयने आणखी एक कडक नियम लागू केला आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ एकावेळी केवळ ५ खेळाडूच उभे राहू शकतील. मग ते १६ खेळाडूंच्या यादीतील असोत किंवा उर्वरित स्क्वॉडमधील. ५ पेक्षा जास्त खेळाडूंनी तिथे गर्दी केल्यास कारवाई होऊ शकते. सहसा हेच खेळाडू बाउंड्री बाहेर गेलेला चेंडू आणण्यासाठी किंवा ड्रिंक्स नेण्यासाठी सज्ज असतात.
शिस्तीचा बडगा की रणनीतीला चाप?
बीसीसीआयने मॅच प्लेइंग कंडीशन्सच्या (MPC) क्लॉज ११.५.२ आणि २४.१.४ मध्ये हे बदल केले आहेत. या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, सामन्यादरम्यान होणारी अनावश्यक हालचाल रोखणे आणि खेळात सातत्य राखणे हा मुख्य उद्देश असल्याचे समजते. यामुळे आता मैदानातील खेळाडूंशी संवाद साधताना कर्णधार आणि प्रशिक्षकांना नव्या मर्यादांचा सामना करावा लागणार आहे.





