BCCI : एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ‘या’ मालिकेचे ठिकाण बदलले, चंदीगड आणि दिल्लीमध्ये खेळवले जाणार सामने

BCCI Shifts IND vs AUS Women’s ODI Series Venues : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेला ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यात एकूण ८ संघ सहभागी होतील. या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येईल. जेणेकरून दोन्ही संघ २०२५ च्या विश्वचषकासाठी चांगली तयारी करू शकतील. आता या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. याबाबत बीसीसीआयने प्रेस रिलीज जारी करुन माहिती दिली आहे.
पहिले दोन वनडे सामने चेन्नईऐवजी चंदीगडमध्ये होणार –
बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यातील एकदिवसीय मालिका चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होती, परंतु तेथे आउटफिल्ड आणि खेळपट्ट्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कारणास्तव, बीसीसीआयने एकदिवसीय मालिका चेन्नईहून हलवली आहे. आता मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने चंदीगडमधील नवीन पीसीए स्टेडियममध्ये खेळवले जातील. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
🚨 NEWS 🚨
BCCI announces updated venues for Team India (International home season) & South Africa A Tour of India.
Details 🔽 #TeamIndia | @IDFCFIRSTBank https://t.co/vaXuFZQDRA
— BCCI (@BCCI) June 9, 2025
१४ सप्टेंबरपासून एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात –
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना १७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही सामने न्यू चंदीगड येथे होतील. शेवटचा सामना २० सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तिन्ही एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील.
हेही वाचा – Shreyas Iyer : ‘…म्हणून श्रेयसला कॅप्टन्सी करायला आवडते’, टी-२० मुंबई लीगमध्ये केला स्वत:च खुलासा
महिला विश्वचषकाचे सामने पाच ठिकाणी होणार –
भारतात होणाऱ्या २०२५ च्या विश्वचषकाच्या तारखा आयसीसीने आधीच जाहीर केल्या आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत आणि पाच ठिकाणी सामने खेळवले जातील. यामध्ये बंगळुरू, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि कोलंबो यांचा समावेश आहे. या स्पर्धेत यजमान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशसह एकूण ८ संघ सहभागी होतील.





