BCCI Family Policy : ‘नो फॅमिली, ओन्ली क्रिकेट!’ बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम, खेळाडूंच्या कुटुंबाबाबत घेतला मोठा निर्णय
BCCI Family Policy : टी-२० विश्वचषक २०२६ च्या धामधुमीत भारतीय खेळाडूंनी केलेली एक महत्त्वाची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फेटाळून लावली आहे.

BCCI rejects family travel request for T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या धामधुमीत भारतीय खेळाडूंनी केलेली एक महत्त्वाची मागणी बीसीसीआयने (BCCI) फेटाळून लावली आहे. स्पर्धेदरम्यान आपल्या पत्नी आणि मुलांसह प्रवास करण्याची परवानगी टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने मागितली होती, परंतु बोर्डाने आपल्या नियमावलीचा दाखला देत ही विनंती अमान्य केली आहे.
नियम सर्वांसाठी सारखाच; १४ दिवसांची अट आडवी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी कडक शिस्तीची नवी नियमावली जाहीर केली होती. बीसीसीआयच्या नियमानुसार, ४५ दिवसांच्या परदेशी दौऱ्यात खेळाडू आपल्या जोडीदाराला आणि मुलांना जास्तीत जास्त १४ दिवसांसाठी सोबत ठेवू शकतात. यंदाचा टी-२० वर्ल्ड कप भारतात आणि काही प्रमाणात श्रीलंकेत होत आहे. ही स्पर्धा महिनाभर चालणारी असल्याने आणि दौरा ४५ दिवसांपेक्षा कमी असल्याने बोर्डाने नियम शिथिल करण्यास नकार दिला आहे.
बीसीसीआयने दिला ‘हा’ पर्याय –
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या पत्नी आणि मुलांना सोबत प्रवासाची परवानगी मागितली होती. त्यावर बीसीसीआयने स्पष्ट केले की, कुटुंबीय खेळाडूंसोबत एकाच हॉटेलमध्ये किंवा प्रवासात राहणार नाहीत. मात्र, जर कुटुंबियांना सामना पाहायला यायचे असेल, तर त्यांच्यासाठी वेगळी राहण्याची सोय करण्याचा पर्याय बोर्डाने उपलब्ध करून दिला आहे.
चार्टर प्लेन आणि पर्सनल शेफचा लवाजमा –
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत प्रायव्हेट चार्टर प्लेनने प्रवास करत आहे. विशेष म्हणजे, संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी आपले पर्सनल शेफही सोबत घेतले आहेत. मात्र, हे शेफ खेळाडूंच्या हॉटेलमध्ये न राहता जवळच्या इतर हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. शिस्तीच्या बाबतीत बोर्डाने कोणताही समझोता न करण्याचे धोरण अवलंबले आहे.
कोलंबो दौऱ्यासाठीही तोच नियम –
भारतीय संघ साखळी फेरीतील ३ सामने भारतात आणि एक महत्त्वाचा सामना पाकिस्तानविरुद्ध कोलंबोमध्ये खेळणार आहे. श्रीलंकेच्या या संक्षिप्त दौऱ्यासाठीही फॅमिली ट्रॅव्हलला परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळाडूंचे पूर्ण लक्ष केवळ खेळावर आणि विश्वचषकावर असावे, हाच यामागचा बीसीसीआयचा मुख्य उद्देश असल्याचे समजते.






