IPL 2026 Guidelines : BCCIचा नवा ‘फतवा’! IPL 2026 मध्ये सामन्याच्या दिवशी सरावावर बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई; पाहा नवी गाईडलाईन
IPL 2026 Guidelines : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयने फ्रँचायझींसाठी नवी 'प्रॅक्टिस शेड्युल गाईडलाईन' जारी केली आहे.

BCCI IPL 2026 Guidelines and New Rules : आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी बीसीसीआय (BCCI) ने आपल्या नियमावलीत ऐतिहासिक आणि अत्यंत कडक बदल केले आहेत. स्पर्धा अधिक व्यावसायिक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी बोर्डाने सराव सत्रापासून ते थेट सामन्याच्या दिवसापर्यंतच्या नियमांत मोठे फेरबदल केले असून, यामुळे संघांच्या रणनीतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ च्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयने फ्रँचायझींसाठी नवी ‘प्रॅक्टिस शेड्युल गाईडलाईन’ जारी केली आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे सामन्याच्या दिवशी (Match Day) कोणत्याही संघाला मैदानावर सराव करण्याची परवानगी नसेल. खेळाडूंवरचा अतिरिक्त ताण कमी करणे आणि खेळपट्टीची गुणवत्ता राखणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
वानखेडेवर सराव करताना ‘या’ नियमांचे पालन अनिवार्य –
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सरावासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही संघांना सरावासाठी स्वतंत्र खेळपट्ट्या (Wickets) दिल्या जातील. एखादा संघ विरोधी संघाच्या वाट्याला आलेल्या खेळपट्टीचा वापर करू शकणार नाही. तसेच, सराव क्षेत्रात ‘रेंज हिटिंग’साठी फक्त एक साईड विकेट आणि मर्यादित नेट्स उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, एका संघाने सराव लवकर संपवला तरी ती खेळपट्टी दुसऱ्या संघाला वापरता येणार नाही.
ड्रेसिंग रूम आणि शिस्तीचे कडक नियम –
- नो फिटनेस टेस्ट: सामन्याच्या दिवशी खेळाडूंची कोणतीही फिटनेस टेस्ट घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
- कडक एन्ट्री: ड्रेसिंग रूम आणि मैदानात फक्त अधिकृत स्टाफलाच प्रवेश मिळेल. सपोर्ट स्टाफला ‘एक्रेडिटेशन कार्ड’ सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
- ट्रॅव्हल प्रोटोकॉल: खेळाडूंना सराव सत्रासाठी टीम बसनेच यावे लागेल; कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना स्वतःच्या खाजगी वाहनाने यावे लागेल.
- कॅप आणि ड्रेस कोड: ऑरेंज आणि पर्पल कॅप धारकांना मैदानात ती टोपी घालणे सक्तीचे आहे. तसेच, सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये ठराविक ड्रेस कोड पाळणे बंधनकारक असून, नियम मोडल्यास दंड आकारला जाईल.
बीसीसीआयच्या या नव्या नियमांमुळे आयपीएलचा दर्जा अधिक सुधारणार असला तरी, सामन्याच्या दिवशी सराव न मिळाल्याने खेळाडूंच्या तयारीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





