Suryakumar Yadav : ‘जरी फॉर्म खराब असला, तरी धमाका होणारच!’, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी सूर्याचं मोठ वक्तव्य

Suryakumar Yadav statement on his performance : भारतीय टी-२० संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे. गेल्या काही काळापासून त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने त्याच्यावर टीका होत असली, तरी सूर्याने मात्र आत्मविश्वास गमावलेला नाही. २०२५ मध्ये एकही अर्धशतक झळकावता न आल्याने त्याने प्रथमच आपल्या फॉर्मबद्दल जाहीरपणे भाष्य केले आहे.
ही ‘लर्निंग स्टेज’ आहे – सूर्याचा विश्वास
एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार म्हणाला की, खेळाडूची कारकीर्द नेहमीच शिखरावर नसते. तो म्हणाला, “क्रीडा क्षेत्र तुम्हाला खूप काही शिकवते. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा काळ येतो, ज्याला मी ‘लर्निंग स्टेज’ मानतो. सध्या माझ्यासोबतही तेच घडत आहे. पण, मला माझ्या संघातील १४ जवानांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना माहित आहे की, ज्या दिवशी माझा ‘ब्लास्ट’ होईल (धडाकेबाज खेळी), त्या दिवशी काय होईल.”
आकडेवारी चिंतेची, पण सराव जोरात –
गेल्या वर्षभरात सूर्याची आकडेवारी पाहता, क्रमांक ३ आणि ४ वर खेळताना २२ डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. या काळात त्याची सरासरी १२.८४ आणि स्ट्राईक रेट ११७.८७ इतका खाली घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने १२, ५, १२ आणि ५ अशा निराशाजनक धावा केल्या. मात्र, बीसीसीआयच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना तो हसत म्हणाला, “हा पॅच थोडा मोठा झाला आहे, पण मी यातून नक्कीच सावरिन. मला माहित आहे की चुका कुठे होत आहेत आणि त्यावर काम करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ आहे.”
टी-२० विश्वचषकापूर्वी पुनरागमनाचा निर्धार –
७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. २०२४ च्या विश्वचषक विजयानंतर रोहित शर्माच्या जागी कर्णधारपद स्वीकारल्यापासून सूर्याची बॅट शांत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो दोनदा शून्यावर बाद झाला होता. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध केलेल्या नाबाद ४७ धावा सोडल्यास त्याच्या नावावर मोठी धावसंख्या नाही.





