Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ! 19 नोव्हेंबरपर्यंत अनेक राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा.

Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.
१४ नोव्हेंबरला या क्षेत्राचे कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात, तर १५ नोव्हेंबरला त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ वायव्य दिशेने सरकून १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. या संभाव्य वादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही भागांत वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील राज्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये जाणवू शकतो. १३ ते १५ नोव्हेंबर आणि पुन्हा १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे पावसाची शक्यता आहे. केरळ आणि माहे परिसरात १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पाऊस पडू शकतो. लक्षद्वीपमध्ये १३ ते १९ नोव्हेंबर, तर किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा भागात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान पावसाचा अंदाज आहे.
१५ नोव्हेंबरला तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान केरळ आणि माहे परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. १८ आणि १९ नोव्हेंबरला किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशालाही पावसाचा फटका
पूर्व भारतातील राज्यांनाही या हवामान बदलाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. १३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ आणि १९ नोव्हेंबरला पश्चिम बंगालच्या गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी भाग आणि ओडिशामध्ये पावसाचा अंदाज आहे.
१३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहू शकतात. १८ आणि १९ नोव्हेंबरला या बेटांवर, तर १९ नोव्हेंबरला पश्चिम बंगालच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर, तर १८ आणि १९ नोव्हेंबरला ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातील राज्यांमध्येही पावसाची शक्यता
उत्तर-पश्चिम भारतातील काही राज्यांमध्येही हवामान बदलाचा परिणाम दिसू शकतो. १३ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ नोव्हेंबरला या भागांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.
हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबमध्ये १३ आणि १४ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला, तर पूर्व राजस्थानमध्ये १५ नोव्हेंबरला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामानातील या बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे. पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज असलेल्या भागांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ?
महाराष्ट्राला सध्या मोठा धोका नाही. बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होण्याची शक्यता सध्याच्या हवामान अंदाजात दिसत नाही. १९ नोव्हेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विशेष पावसाचा इशारा नाही. त्यामुळे राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, वादळाची दिशा बदलल्यास परिस्थिती बदलू शकते.





