बावडा, लाखेवाडीला अवकाळीचा तडाखा

द्राक्ष, रब्बी हंगामातील पिकांना फटका
रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील बावडा, लाखेवाडी व रामवाडी शेटफळ हवेली परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. शेतामधील उभ्या पिकांची तसेच ज्वारी, मका व द्राक्षाच्या बागा आणि काढून टाकलेला कांदा याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सोमवार संध्याकाळी साडेसात ते आठच्यादरम्यान अवकाळीचा झाला. यात पिके, द्राक्षबागांचे नुकसान झाले.
नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे तसेच काढणीला आलेल्या ज्वारी, हरभरा व इतर पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लाखेवाडी, शेटफळ हवेली परिसरामध्ये जम्बो द्राक्षांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.
फळधारणेच्या अवस्थेत या बागायतदारांना बसला असून लाखो रुपये केलेला खर्च अवकाळीत वाहून गेला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून इंदापूर तालुका निसर्गाच्या तडाख्यात पिळून निघत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके पदरात पडतात की नाही, याची चिंता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.





