बावधन: गावाच्या विकासासाठी मिळणार ‘गायरान जमीन’, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

बावधन – मुळशी तालुक्यातील बावधन येथील शिल्लक गायरान जमीनीचा वापर गावच्या विकासासाठी व्हावा. त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिली. तसेच आत्तापर्यंत वाटप केलेल्या गायरान जागांचा उपयोग न झाल्यास त्यांना एक महिन्यांची नोटीस देण्याचे निर्देश दिल्याचेही दगडे पाटील यांनी सांगितले.
बावधन गावातील गायरान मिळकतीमधील बहुतांश क्षेत्र वेगवेगळ्या संस्था आणि विभागांना दिले. मात्र, ज्या हेतूने हे क्षेत्र दिले, त्यासाठी या जमीनीचा वापर झाला नाही. बहुतांश क्षेत्र अजूनही विकसित झालेले नाही. त्यामुळे हे सर्व क्षेत्र बावधन गावाच्या विकासासाठी आणि येथील रहिवासी यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परत मिळावे. तर उर्वरित गायरान क्षेत्राचे यापुढे कोणालाही वाटप होवू नये, अशी मागणी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील आणि सरपंच पियुषा किरण दगडे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
त्याबाबत महसुलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली. यावेळी माजी नगरसेवक किरण दगडे उपस्थित होते. या बैठकीत हे दोन्ही निर्देश दिले असून, त्यामुळे लढ्यातील पहिले यश मिळाल्याचे दगडे यांनी सांगितले.
“ही बैठक म्हणजे गावच्या हक्कासाठी घेतलेले एक ठोस पाऊल आहे. त्यामध्ये ऍड. सूरज चकोर आणि ऍड. अमित आव्हाड यांची मोलाची साथ लाभली. गावाची जमीन गावाच्या हितासाठी मिळावी, ही आमची भूमिका ठाम आहे आणि राहील.” -किरण दगडे पाटील (माजी नगरसेवक, पुणे मनपा)





