Pune gramin | बारामतीकरांनी घेतला मनसोक्त आनंद; एन्व्हॉर्यमेंटल फोरमतर्फे हॅपी स्ट्रीटनिमित्त उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
बारामती – रस्त्यावर उतरुन विविध खेळांचा आनंद लुटणारी बच्चे कंपनी, त्यांच्यासोबतच खेळाचा आनंद घेणारे पालक, माउथऑर्गन, बासरी, सिंथेसाईजरवर वाजणारी लोकप्रिय गीते, दुसरीकडे कुंचल्यातून कागदावर साकारणारी सुंदर चित्रे व कार्टून, जोडीला काढून मिळणारे टॅटू या सगळ्यांच्या जोडीला अवीट गोडीची व तरुणाईला भुरळ पाडतील अशा गाण्यांचे सादरीकरण अशा वातावरणात एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सादर करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उपक्रम पार पडला.
फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. युवा नेते पार्थ पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पोलीस निरिक्षक विलास नाळे व वैशाली पाटील, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. नीलीमा गुजर, विश्वस्त किरण गुजर, मंदार सिकची उपस्थित होते.
मोबाइलच्या जमान्यात घराबाहेर पडून खेळ खेळण्यासह नृत्याचा मनमुराद आनंद शनिवारी (दि.26) बारामतीकरांनी लुटला. नितीन दोशी व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या जुन्या नवीन गीतांच्या ठेक्यावर बारामतीकरांनी मनसोक्त नृत्य केले. (दि.27) सकाळी रम्य वातावरणात खेळांचा आनंद लुटल्यानंतर एक वेगळाच आनंद बारामतीकरांनी अनुभवला. खाऊगल्लीतही लोकांनी खाद्यपदार्थांवर ताव मारला.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित हॅपी स्ट्रीटस उपक्रमामध्ये लहान मुलांसह आबालवृध्दांना चार क्षण विरंगुळा मिळावा व त्यांचे मन प्रफुल्लित व्हावे या उद्देशाने अनेक खेळ, योग, नृत्य, गाणी, वादन, कला, क्रीडा या प्रकारांचे आयोजन केले. यावेळी कॅरिकेचर, फेसपेटिंग, टॅटू, मेंदी, क्राफ्ट, वारली पेटींग या सह, सापशिडी, लुडो, धर्नुविद्या, योग, आरोग्य विषयक इतर उपक्रम, मल्लखांब, स्केटींग, लाईव्ह म्युझिक सादर केले.





