पुणे जिल्हा | शनिवारी बारामती ते पुणे राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा

पिरंगुट, (वार्ताहर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राज्य व राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (दि.२०) रोजी ही स्पर्धा संपन्न होणार असून स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष आहे, अशी माहिती पुणे जिल्हा मंडळाचे मानद सचिव अॅड संदीप कदम यांनी दिली. यावेळी खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार आदी उपस्थित होते.
“सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र” यांच्या मान्यतेने ही स्पर्धा संपन्न होत आहे. शनिवारवाडा येथे रॅलीचे उदघाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी पार्थ पवार, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग, एशियन सायकलिंग फेडरेशनचे महासचिव ओंकार सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण बारामती येथे गदिमा सभागृहात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, अभिनेते अमोल लंके यांच्या हस्ते होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ममोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू पराग काळकर, जय पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
स्पर्धेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, एअर फोर्स, तामिळनाडू, बिहार, गुजरात, राजस्थान, मध्य रेल्वे, नवी दिल्ली व महाराष्ट्र येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित जवळपास ४५० ते ५०० स्पर्धक सहभागी होणार आहेत.
सायकलिंग क्षेत्रातील खेळाडूंना उत्तेजन देणे त्याचप्रमाणे या रॅलीच्या माध्यमातून समाजाला पर्यावरण संवर्धन, आरोग्य वर्धन, बेटी बचाओ, स्वच्छता अभियान, वाहतूक व प्रदूषण यांच्याबद्दल जनजागृती करणे व समाजाला प्रबोधन करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
त्याचप्रमाणे पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक याबाबत जनतेला संदेश संदेश देण्यासाठी पुणे ते हडपसर सायकल रॅलीचे सुध्दा आयोजन केले आहे. सदर रॅली ही सर्वांसाठी खुली असून त्यामध्ये ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी होणार आहेत.





