Baramati: सारथी संस्थेकडून नेट-सेट परीक्षेचे ऑफलाईन कोचिंग बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. हे कोचिंग तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी भाजप युवा मोर्चा पुणेचे जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी सारथी संस्थेचे संचालक यांना पत्र लिहून केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही हे प्रकरण लक्षात आणून दिले आहे. मागणीमागची कारणे काय? सोलनकर यांनी पत्रात नमूद केले की, राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर सहाय्यक प्राध्यापकांची भरती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर सारथीने ऑफलाईन कोचिंग बंद केल्याने अनेक विद्यार्थी, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनापासून वंचित राहत आहेत. अनेक विद्यार्थी अवघ्या काही गुणांनी परीक्षेत अपयशी ठरतात, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात असेही त्यांनी अधोरेखित केले. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची मागणी – भाजप युवा मोर्चाने मागणी केली आहे की, नेट-सेट विद्यार्थ्यांसाठी किमान सहा महिन्यांचे व्यवस्थित ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करावे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंका निरसनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. सोलनकर यांनी म्हंटले की, “सारथीकडून नेट-सेट प्रशिक्षण पूर्णपणे बंद करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. राज्यात संभाव्य सहाय्यक प्राध्यापक भरती लक्षात घेता सहा महिन्यांचे ऑफलाईन प्रशिक्षण तात्काळ सुरू करण्यात यावे.” या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर यांच्यासह सरचिटणीस स्वप्नील मोडक, ओमकार कड्डे, अमर बुडगुडे, जीवन साखरे, आबासाहेब थोरात, रोहित शिंदे, युवती प्रमुख रसिक सणस, विवेक साळुंखे, जगदीश कोळेकर, संदीप केसकर, शुभम सूर्यवंशी, सुजित सोरटे आदी पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.