Baramati Pulse Polio : बारामतीत पल्स पोलिओ मोहीम ; १२ ऑक्टोबरला ३३ हजार बालकांचे लसीकरण

प्रभात वृत्तसेवा
बारामती – पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने तालुक्यात रविवार, (दि.१२) ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, यामध्ये तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.तालुक्यात ग्रामीण भागातील २५ हजार ४१८ आणि शहरी भागातील ८ हजार १२४ असे एकूण ३३ हजार ५५२ बालकांना लसीकरण करण्याचे नियोजन केले असून तयारी पूर्ण केली आहे.
यामध्ये ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी विशेष लसीकरण कक्ष स्थापन केलेले आहेत. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. लसीकरणाकरिता २८२ बूथ उभारले जाणार आहेत. याकरिता एकूण ६३८ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहे. मोहिमेअंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १४ ते १६ या कालावधीत गृहभेटीद्वारे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.





