Baramati Politics : नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच! अजित पवारांसमोर मातब्बर उमेदवारांचे आव्हान, कोणाला मिळणार संधी?

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभाग रचनेनंतर नगराध्यक्ष आरक्षण तसेच प्रभागातील आरक्षणाची सोडत झाल्यानंतर इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने प्रस्तापिथांमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे. कोणाला मिळणार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी याकडे बारामतीकरांची लक्ष लागले आहे. उमेदवार निवडीत मातब्बर इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बारामतीच्या मैदानात अजित पवारांचा कस लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती नगरपरिषदेवर गेले अनेक वर्ष एकहाती वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पाच वर्ष संधी मिळणार आहे. यंदाचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. तरी नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण होणार हे मात्र नक्की आहे. नगराध्यक्षपदासाठी अजित पवार हे कोणाला संधी देणार याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. अनेक नावांचा समावेश यामध्ये आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सचिन सातव यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.
ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर यांना देखील अजित पवार संधी देऊ शकतात. गेले अनेक वर्ष नगरपरिषद कामकाजाचा किरण गुजर यांना अनुभव आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच्या कामाच्या शैलीचा बारामतीकरांना अनुभव आहे. त्यामुळे किरण गुजर हे देखील नगराध्यक्ष पदाचे दावेदार ठरू शकतात. माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी हे नाव देखील चर्चेत आहे. सोमानी यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पदाची कमान सांभाळली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करणारे व्यक्तिमत्व म्हणून सोमानी यांची ओळख आहे.
उमेदवार निवडीत दादांचा कस?
अजित पवार गटात किमान पाच ते सहा दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे. हे सर्वजण नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. जमेची बाजू ही आहे की, मातब्बर, मास लीडर असलेले नेते आहेत. त्यामुळे उमेदवारी निवडीपासून अजित पवार यांचा कस लागणार आहे. नगरपरिषदेचा विस्तार पाहता ताकदीनिशी काम करणाऱ्या प्रशासकीय अनुभव तसेच खमक्या नगराध्यक्षाची अजित पवार निवड करणाऱ्या शंका नाही. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता मात्र बारामतीकरांना लागून राहिले आहे. अजित पवार यापैकी कोणाला संधी देणार का नवीन चेहरा समोर आणणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष..
शरद पवार गट बारामती नगर परिषदेत काय करणार याकडे देखील लक्ष लागले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुभवानंतर शरद पवार गट बारामती नगरपरिषद ताकतीने लढणार का, याबाबत देखील तर्कवितर्क काढले जात आहेत. शरद पवार गटाने परिषदेची निवडणूक लढवली तर माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्या नावाची चर्चा नगराध्यक्ष पदासाठी केली जात आहे. युगेंद्र पवार यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असणार आहे.




