बारामती : रस्त्याच्या वादावरुन दोन भावांच्या भांडणात एकाचा खून

मोरगाव : मोढवे (ता.बारामती) गावामध्ये शेतात जाणाऱ्या रस्त्यावर लाकडी ओंडके आडवे का टाकले अशी विचारणा केली असल्याच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये धाकट्या भावाने थोरल्या भावाचा खून केला असल्याची घटना घडली . भर दिवसा दि. 12 ऑगस्ट रोजी घडली असून परीसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोढवे (ता. बारामती) येथे आरोपी रामा सोमा मोटे याने शेतात जाणाऱ्या घरानजीकच्या रस्त्यावर लाकडी ओंडके आडवे टाकले होते. याबाबत विचारणा तायाप्पा सोमा मोटे वय वर्षे ६० यांनी केली. यावर या रस्त्याने जायचे नाही नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे बोलून शिवीगाळ व मारहाण केली.
या दरम्यान फिर्यादी लक्ष्मी महादेव मोटे यांच्या सासऱ्याच्या हातातील कुऱ्हाड रामा मोटे याने हिसकून घेतली . या झटापटीत ते खाली पडले. याचवेळी आरोपी याने हातातील कुऱ्हाडीने तायाप्पा मोटे याच्या डोक्यावर वार करणार करत असताना तो वार रामा मोटे याने चुकवला असता तो वार डाव्या पायाचे पिंडीवर बसला.
डाव्या पायाच्या बसलेला वार हा वर्मी लागल्याने तीव्र प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तायाप्पा यांचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती समजतात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व बारामती उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करत आहेत.





