Baramati News : ‘ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं…’; प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कबाहेर रोखलं, मविआ आक्रमक !

Pratibha Pawar । Baramati news : बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार रंगत येऊ लागली आहे. दोन्ही पवार कुटुंबीय मतदारसंघात फिरताना दिसत आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही युगेंद्र पवार यांचा घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळेदेखील सोबत देत आहेत.
आज या दोघी बारामती टेक्सटाईलमध्ये पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी गेटला टाळं लावण्यात आलं होतं. बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं. अर्धा तास झाल्यानंतरही त्यांनी आत सोडलं नाही असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
आपण खरेदी करण्यासाठी आत जात असल्याचं प्रतिभा पवारांचं म्हणणं आहे. यावेळी प्रतिभा पवार आपल्याला प्रवेश का दिला जात नाहीये, असा सवाल तेथील सुरक्षा रक्षकाला करतात. त्यावर वरिष्ठांकडून कोणालाही आत सोडण्यास परवानगी नसल्याचं गेटवरील सुरक्षा रक्षकाने उत्तर दिले.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आता बारामतीचं राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. या घटनेवरती महाविकास आघाडीने देखील पोस्ट शेअर करत हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडीच्या अधिकृत सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंट वरती या घटनेचा व्हिडिओ शेअर करून टीका केली आहे. “आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली..! देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले.
आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली..!
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही.ह्या… pic.twitter.com/11NapIKNc0
— महाविकास आघाडी Official (@MahavikasAghad3) November 17, 2024
तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही.ह्या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत सौ. सुनेत्रा पवार. ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांचा रस्ता तुम्ही आज अडवलंय.’ या आशयाचे ट्विट करण्यात आले आहे.





