Baramati News – मंडळाच्या नोंदणी करिता आटो रिक्षा चालकावर होणारी बळजबरी थांबवा, या प्रमुख मागणी करिता तसेच परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाच्या निषेधार्थ बुधवार, आठ एप्रिल रोजी परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रशांत सातव यांच्या नेतृत्वात व बारामती दौंड इंदापूर ऑटो रिक्षा कृती समितीचे सचिव प्रा. डॉ. भीमराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात शहरातील शेकडो ऑटो चालक सहभागी होतील. यावेळी परिवहन मंत्र्याच्या एकतर्फी धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे. याचदिवशी संपूर्ण राज्यात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्री सातव यांनी दिली आहे. धर्मवीर आनंदराव दिघे साहेब ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळाचा सदस्य होण्यासाठी परिवहन कार्यालयाकडून ऑटो रिक्षा चालकांवर बळजबरी केली जात आहे. मंडळाचा सदस्य न झाल्यास ऑटो रिक्षा चालकांचे परमिट नूतनीकरण, पासिंग आदी कामे थांबवली जातात. नोंदणी करिता ऑटोरिक्षा चालकाकडून ५०० रुपये प्रवेश फी आणि तीनशे रुपये वार्षिक शुल्क घेतले जाते. आरटीओ कार्यालयाकडून होत असलेली बळजबरी तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. उपरोक्त मागणी करिता २३ मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन केले होते. मात्र, सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. परिवहन मंत्र्यांच्या बेकायदेशीर धोरणाच्या विरोधात बुधवार आठ एप्रिल रोजी बारामती उपविभागीय परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही परिवहनमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल असेही सातव यांनी स्पष्ट केले.