माळेगाव बुद्रुक येथील महावितरण शाखेच्या नियोजनबद्ध आणि अथक प्रयत्नांमुळे यंदाच्या गणेशोत्सवात संपूर्ण गावात उत्साह आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे. गणपती उत्सवापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण केल्याने वीज खंडित होण्याच्या तक्रारी पूर्णपणे थांबल्या आहेत. महावितरणने गणेशोत्सवापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणे, दिवाबत्ती दुरुस्ती, आणि वीज वाहिन्यांची तपासणी व दुरुस्ती ही कामे यशस्वीपणे पार पाडली. यामुळे गणपती मंडळांच्या आरत्या वेळेवर होत असून, घरगुती गणपती पूजा आणि प्रसाद वाटपही अखंडितपणे सुरू आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागलेला नाही. ग्रामस्थ आणि गणेश मंडळांनी महावितरणच्या कार्यक्षमतेचे तोंडभरून कौतुक केले आहे. नवयुग गणेश उत्सव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश रासकर म्हणाले, “यंदाच्या गणेशोत्सवात माळेगाव महावितरण शाखेने आम्हाला खूप सहकार्य केले. वीजपुरवठा अखंडित राहिल्याने आमच्या मंडळाचे सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडत आहेत. यासाठी आम्ही कनिष्ठ अभियंता सूरज ठोंबरे आणि सर्व जनमित्रांचा सत्कार करणार आहोत.” माळेगाव महावितरण शाखेचे कनिष्ठ अभियंता सूरज ठोंबरे यांच्यासह जनमित्र लघु जाधव, राजेश इंगळे, निलेश होले, अनंत सावंत, आजिनाथ गर्जे, विठ्ठल चंदनकर, अनिल ठाकरे, किशोर ननावरे, निलेश सोलकर, भारत तावरे, अक्षय जाधव, उमेश पैठणकर, संकेत साळुंखे, आदित्य नलगे आणि यश शिंदे यांनी गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. महावितरणच्या या सजगतेमुळे माळेगावात गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला असून, नागरिकांमध्ये विश्वास आणि समाधान निर्माण झाले आहे. सार्वजनिक संस्थांच्या सहकार्याने हा उत्सव अधिक आनंददायी ठरत आहे.